पुणे

महसुल अदालत चा लाभ नागरीकांनी घेऊन सहभाग नोंदवावा, डॉ यशवंत माने, उपविभागीय अधिकारी हवेली यांचे आवाहन

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

पुणे -शासनाने १०० दिवसांचा उपक्रम आयोजीत करून नागरीकांचे दैनंदीन जिवनमान सुखकर होणे कामी उपक्रम राबवण्याबाबत सर्व प्रशासनास आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने मा. महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी महसुल प्रशासनास आदेश देऊन महसुल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शकपणे व जलदगतीने घेऊन नागरीकांना किरकोळ कामास हेलपाटे मारावे लागणार नाही. याकामी आवश्यक उपाययोजना करणेबाबत निर्देश दिले गेले आहेत. 

जिल्हाधिकारी पुणे यांनीही महसुल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा ऑनलाईन स्वरूपात विहित मुदतीमध्ये नागरीकांना उपलब्ध करून देणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचाच भाग म्हणून डॉ यशवंत माने यांचे संकल्पनेतून दिनांक १५/0५/२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी हवेली येथे महसुल अदालत आयोजीत करण्यात आली होती. तुकडेबंदी व तुकडेजोड कायदयामधील तरतूदीचा भंग होऊन झालेले हस्तांतरण, कुळकायदा कलम ८४ क स पात्र नमुद करून प्रदिर्घ कालावधी झालेले प्रकरणे, गौणखनिज उत्खननाबाबत पारीत केलेले आदेश तसेच जुन्या दस्तांची नोंदी बाबतचे फेरफार, वारस नोंदीबाबतचे फेरफार, विविध ॲथॉरीटी चे दाखल शेरे कमी करणेबाबत शासन पक्षकार असणारे एकुण १७० प्रकरणे सदर महसुल अदालत मध्ये ठेवणेत आली होती.

सदर महसुल अदालतीस नागरीकांनी व त्यांचे विधीज्ञ यांनी उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला आहे. महसुल अदालतीमध्ये एकुण १२८ प्रकरणे निवाडा करणेसाठी प्रथम सुनावणीमध्येच बंद करणेत आली आहेत. काही प्रकरणामध्ये अपुर्ण कागदपत्रे असल्याने पुर्तता करणेस ८ दिवसांची मुदत संबधित पक्षकार यांना देणेत आली आहे. महसुल अदालतमध्ये निर्णयासाठी बंद करणेत आलेल्या प्रकरणामध्ये पुढील १ महिन्यांत निकाल पारीत करून सदर निकाल नागरीकांना पाहणेसाठी www.eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देणेत येणार आहे. यापुढेही दर महिन्याला महसुल अदालत चे आयोजन करणेत येणार आहे. महसुल अदालत आयोजीत केलेमुळे नागरीकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाही. त्यांचे प्रकरणातील निकाल ऑनलाईन पाहता येणार आहेत. महसुल अदालत चा लाभ नागरीकांनी घेऊन सहभाग नोंदवावा असे आव्हान डॉ यशवंत माने, उपविभागीय अधिकारी हवेली यांनी केले आहे.