पुणे

“पुण्यात ठाकरेंच्या पक्षातील आऊटगोईंग सुरूच, शहरप्रमुख नाना भानगिरेंनी ठाकरेंचा नेता फोडला, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, शहर संघटकपदाची जबाबदारी

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग आणि शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. एकापाठोपाठ एक नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. पुण्यातील ठाकरे गटाचे नेते आनंद गोयल यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे यांचे जवळचे निकटवर्तीय आनंद गोयल यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. ते शिवसेना ठाकरे गटात शहर संघटक पदी होते. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली. शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नांना यश आले. ठाकरे गटाच्या अनेक आजी आणि माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.

पुण्यातील शिवसेना शिंदे गटाकडून दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संघटना अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २४ मे २०२५ रोजी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे.

आनंद गोयल आपल्या कार्यातून आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून शिवसेनेला पुणे शहरात नवीन उंचीवर घेऊन जातील व समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनेला भक्कम आधार देतील. गोयल यांना या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छा मिळत आहेत. ते आधीपासूनच पर्यावरण संरक्षण, धार्मिक सेवा आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय आहेत. आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते शिवसेनेला पुण्यात अधिक प्रभावी आणि मजबूत बनवतील
प्रमोद नाना भानगिरे 
शहरप्रमुख – शिवसेना पुणे