कल्याणमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका ६३ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून तब्बल २७ लाख ९० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.
पीडित व्यक्तीला व्हॉट्सॲपवर कॉल आला.
फोन करणाऱ्याने स्वतःला “मुंबई पोलीस अधिकारी” असल्याचे सांगितले.
तुमचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत आणि तुमच्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाले आहेत, असे खोटे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.
व्हिडिओ कॉलवर आरोपी पोलीस गणवेशात दिसत असल्याने पीडितांचा विश्वास बसला.
यानंतर ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली त्यांना सतत संपर्कात ठेवून मानसिक दबाव टाकण्यात आला.
“या प्रकरणातून बाहेर पडायचं असेल तर पैसे द्या,” असे सांगत आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी ऑनलाइन पैसे उकळले.
सात दिवसांत एकूण २७ लाख ९० हजार रुपये घेतले.
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे —
कोणताही पोलीस अधिकारी व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलवर पैसे मागत नाही, तसेच ‘डिजिटल अटक’सारखी कोणतीही प्रक्रिया नसते.
नागरिकांनी अशा कॉलपासून सावध राहावे आणि संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
