महाविद्यालयीन जीवन हा केवळ पदवी मिळवण्याचा टप्पा नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याचा महत्त्वाचा काळ आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानच नव्हे, तर आत्मविश्वास, शिस्त आणि सामाजिक जाण विकसित होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य आवश्यक असून युवा जीवनात शिक्षणच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन ट्रिनिटी कॉलेजचे संस्थापक कल्याणराव जाधव यांनी केले.
येवलेवाडी-कोंढवा येथील ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विविध विभागांतील गुणवंत विद्यार्थ्यांना “सर्वोत्कृष्ट निरोपार्थी विद्यार्थी पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
डॉ. अशोक बालगुडे म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून कौशल्ये आणि प्रत्यक्ष अनुभव यांना तितकेच महत्त्व आहे. स्वतःमधील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जात राहणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की, विद्यार्थी जबाबदार नागरिक म्हणून समाजात प्रवेश करत असून त्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करावा.
संकुल संचालक समीर कल्ला यांनी बदलत्या काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले.
प्रा. सारिका कोरडे व प्रा. भाग्यश्री चौधरी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. राहुल धोंगडे यांनी आभार मानले.
