पुणे

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या, पुणे हादरलं

पुण्यात पुन्हा एकदा आंदेकर-कोमकर गँगवॉरचा रक्तरंजित अध्याय समोर आला आहे.
वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपीच्या भावावर आज सकाळी बालाजीनगर परिसरात गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीच्या शुटर्सनी ही हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर सध्या तुरुंगात असतानाही टोळीची सूत्रे हलवत असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

वनराज आंदेकर हत्येनंतर सुरू झालेल्या सूडाच्या मालिकेत आतापर्यंत चार हत्या झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, तर कात्रज परिसरात शिंदे नावाच्या व्यक्तीलाही जीव गमवावा लागला होता.

या प्रकरणात तरुण मुलांचा वापर होत असल्याने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यात वाढत्या गँगवॉरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.