#रोखठोक_महाराष्ट्र_न्यूज_ऑनलाईन
हडपसर/पुणे (प्रतिनिधी)
हडपसर परिसरातील बहुचर्चित ससाणेनगर – सय्यद नगर रेल्वे मार्गाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले असून हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात अभ्यास करून कारवाई करून हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील त्रस्त वाहनचालकांना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
हडपसर विधानसभेचे आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आज अजित दादा पवार यांची भेट घेतली. स्वारगेट ते शेवाळवाडी मेट्रो व तसेच ससाणेनगर मधील जिव्हाळ्याचा प्रश्न ससाणे नगर रेल्वेगेट भुयारी मार्ग पुन्हा काम सुरु करण्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी आमदार चेतन तुपे पाटील व माजी महापौर वैशाली बनकर यांनी पत्र दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, नगरसेवक आनंद आलकुंटे, अशोक कांबळे, नंदा लोणकर, योगेश ससाणे, नगरसेविका रुक्साना ईनामदार, फारुक इनामदार, शमशुदिन इनामदार, डॉ.शंतनु जगदाळे, बापू मुलानी व माजी नगरसेवक सुनिल बनकर उपस्थित होते.
ससाणेनगर – सय्यदनगर येथील भुयारी मार्ग तत्कालीन महापालिका सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला होता परंतु महापालिकेत सत्ता बदल झाल्याने व पालकमंत्री बदलल्याने पालक मंत्री व आमदारांनी या कामाला खो घातला व नवीन भुयारी मार्ग केले येथील वाहतूक कोंडी व रस्त्यांचा अभ्यास करून सय्यदनगर ससाणेनगर येथील भुयारी मार्ग मार्गी लावावा असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
ससाणेनगर येथील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला असताना हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व येथील स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पुढाकार घेतल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
हडपसर ससाणेनगर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जो जुना भुयारी मार्ग मंजूर होता तो भुयारी मार्ग करून त्यासाठी महापालिकेने लागणारी तरतूद करावी अशी मागणी केली आहे यासंदर्भात अजितदादा पवार यांनी महापालिका आयुक्तांना भुयारी मार्ग संदर्भात तरतूद करून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिलेले आहेत
चेतन तुपे पाटील
आमदार – हडपसर विधानसभा
