मुंबई : डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
डॉक्टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणं असो की आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं असो, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे असो, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलाझेशन असो किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान असो, आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवत होत्या.
ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचं होतं. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा खेडय़ांनाच सक्षम करणारा हा उपक्रम असून सौर ऊर्जा, ‘हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला या स्मार्ट व्हिलेजमध्ये स्थान असेल. त्याचबरोबर अपंगांसाठी ‘निजबल’, बेरोजगार तरुणांसाठी ‘युवाग्राम’ या प्रकल्पाबरोबरच ‘मियावाकी’ पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा त्यांनी उचलला होता.
आजोबा बाबा आमटे, आईवडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीने डॉ. शीतल यांनी २००३ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन त्या करत होत्या. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला होता. मेडिकल लीडरशिप क्षेत्रात ‘लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी’ सोबत ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले.
