पुणे

एका दिवसात नऊ जबरी चोरी करणाऱ्याला दीड तासात केले जेरबंद हडपसर पोलिसांची कामगिरी ः ९ मोबाईल हँडसेट केले जप्त, ९ जबरी चोरीचे गुन्हे उघड

पुणे ः एका दिवसांत अवघ्या दीड तासात नऊ जबरी करणाऱ्या आरोपींच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर वानवडी, हडपसर, लोणीकंद, मुंढवा, खडक, फरासखाना, मार्केटयार्ड व जामखेड, अहमदनगर पोलीस स्टेशनमध्ये १६ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.

ओंकार विनोद मासाळ ऊर्फ हर्षद सलीम शेख (वय २२, रा. २१७, भरवस्ती, जुना बाजार, मंगळवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आकाशवाणी, हडपसर, पुणे येथील गेट क्र.२ येथे काही तरुण लोकांना लुबाडित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीकडून ९ मोबाईल हँडसेट जप्त केले. आरोपीकडे अधिक तपास केला असता, त्याने आशिष ऊर्फ गुड्डू (रा. नवीन म्हाडा, रामटेकडी) याच्यासोबत चाकूच्या धाकाने धमकावून मोबाईल, चेन, पाकीट चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीवर कोंढवा-२, चंदननगर-२, हडपसर-५ असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पुढील तपास करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांच्या सूचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सूरज कुंभार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.