Uncategorized

पूर्व हवेलीत राजकीय कोपरखळ्या, भावी सदस्यांनी ही बांधला चंग, ‘यशवंत ‘ चे मतांसाठी भांडवलीकरण? प्रतिनिधी – स्वप्नील कदम

लोणी काळभोर -आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. हवेली तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांना इतर कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेऊर ( ता. हवेली ) येथील बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची आठवण येऊ लागली आहे. या निवडणूकीतही हवेलीतील निवडणूक ” बंद पडलेला यशवंत कारखाना ” या प्रश्नाच्या भांडवलावरच लढवली जाणार हे नक्की झाले आहे.

            निवडणूक आल्यावरच राजकीय पुढा-यांना केवळ एकगठ्ठा मतांसाठी यशवंत कारखान्याची आठवण होते. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोयीनुसार यशवंत बंद पडला या विषयाचा वापर करून केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून शेतकरी सभासदांच्या भावनांशी खेळ करून निवडणूकीपुरता हा विषय भिजत ठेवत मते मिळवतात. इतरवेळी मात्र त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. कारण ” या विषयांवर राजकारण करून निवडून यायचे, सत्तेत बसायचे व परत पुढील निवडणुकी पर्यत यशवंत कारखान्याकडे लक्ष द्यायचे नाही” या “मंत्राचा जप” जवळ जवळ सर्वच पक्षांच्या राजकीय नेते व पदाधिका-यांनी अवलंबला आहे.  

             या परिसरातील ऊस नेण्यास कुट्टी व गु-हाळ चालक टाळाटाळ करीत असल्याने शेतक-यांना त्यांचे उंबरे झिजवावे लागत असून बाजारभाव व ऊस बिलाची खात्री नसतानाही केवळ नाइलाज म्हणून शेतक-यांना कुट्टी व गु-हाळमालकांची मनधरणी करावी लागत आहे या कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल झाला असून यशवंत सुरू करण्याचे श्रेय कोणत्याही राजकिय पक्षाने घ्या, परंतु कारखाना सुरू करून येथील शेतक-यांचे संसार वाचवा अशी भावना व्यक्त होत आहे. यशवंतची चाके आर्थिक गर्तेत खोल अडकल्याने संबधित सहकारी संस्थांवरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे.

          कारखान्याच्या मालकीच्या ११३.१८ एकर जमिनीची विक्री करून बॅकेची देणी भागवून उर्वरित रक्कमेतून कारखाना सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु जमीन विक्री प्रक्रियेत कुठे घोडं अडतंय हे अद्यापही न सुटणारे कोडं असून राजकीय पटलावर काही हालचाली होऊन खोडा निर्माण झाल्यामुळे ‘म्हाडा’च्या फाईल पासून रोडावलेली विक्री प्रक्रियेचे गाडे पुढे न सरकल्याने यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे हे कोणासही समजेनासे झाले आहे. सुमारे वीस हजार सभासद व एक हजार कामगारांच्या कुटूंबांच्या चुलीशी निगडीत असलेला साखर कारखाना अडचणीत असून अखेरच्या घटका मोजत आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधींना सोयर – सुतक राहिले नसून मागील काही वर्षापासून फक्त यशवंतचा राजकीय सोयीनुसार तालुक्यातील व जिल्ह्यातील पुढारी सोयीस्कर वापर करत आहे त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांची झोळी अजून रिकामी असून फक्त खोट्या आश्वासनांवर त्यांची बोळवण करण्यात येत आहे.

            हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना व हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या सहकारी संस्था तालुक्याच्या मुख्य रक्तवाहिन्या मानल्या जात होत्या व येथूनच सहकाराच्या माध्यमातून शेतकरी कुटूंबातील काहीजण आमदार, खासदार, विविध बॅकेचे संचालक व तालुक्यातील महत्वाच्या पदी निवडले गेले त्यामुळे एकेकाळी यशवंत व हवेलीचा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा होता परंतु आर्थिक अनियमितेमुळे यशवंतला घरघर लागल्याने तालुक्याच्या शेतकरी सभासदांचे अर्थकारण मंदावले आहे. या भागातील ऊसपिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे

            काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांच्या पोकळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत या भागातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही सरकारच्या विरोधात मतदान केले. भाजपच्या उमेदवाराने विधानसभेला प्रचार सभांमधून यशवंतच्या मालकीची एक गुंठाही जमीन न विकता कारखाना सुरू करणार असे अश्वासन दिले होते. मतदारांनी त्यावर विश्वास ठेवून मते दिल्याने त्यांनी विजय संपादन केला. तत्कालीन खासदारांनी सुद्धा सहा महिन्यात यशवंत सुरू करतो असे उरूळी कांचन येथील जाहीर सभेत सांगितले होते. परंतु निवडणूक झाल्यावर सदर बाब ते सोईस्कर रीत्या विसरून गेले. तसेच शिरूर तालुक्यामध्ये शेतकरी मेळाव्यानिमित्त आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानी यशवंत येत्या पंधरा दिवसात सुरू करतो असे आश्वासन दिले. आता कारखाना नक्की सुरू होणार असा आशावाद सभासद व कामगार बंधूनी बाळगला. परंतू कारखान्याच्या मालकीची ११८ एकर जमिनीच्या विक्रीचे अधिकार राज्य सहकारी बॅकेला देऊन बॅकेकडूनही अपेक्षाभंग झाल्याने सभासद व कामगार पुन्हा निराशेच्या गर्तेत गेले. आता कारखान्या वरील अवसायक नियुक्तीचा आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. हा आदेश देऊनही तीन महीने होत आले आहेत. तरीही या संदर्भात शासकीय पातळीवर काहीही हालचाल केलेली दिसत नाही. 

                          वाढत्या नागरीकरणामुळे यशवंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार नाही असा काहींचा आक्षेप आहे. मात्र कमी गाळप क्षमता असलेला कारखाना सुरू करावा हि शेतकरी सभासदांची इच्छा आहे. तसेच संस्थापक अण्णासाहेब मगर यांनी रक्ताचे पाणी करुन माळरानावर कारखाना उभा केला. त्यांच्या कार्याची आठवण चिरंतन असावी म्हणून कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. यशवंत पुन्हा पुर्ववैभवांत सुरू व्हावा हि सर्व शेतकरी सभासद, कामगार व नागरिकांची इच्छा आहे. परंतू राजकारणी याप्रश्नी जाणूनबुजून अडचणी निर्माण करत असल्याचे लक्षात आल्याने ते नाराज आहेत. येणा-या निवडणूकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याने या प्रश्नाचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जनप्रक्षोभास सामोरे जावे लागण्याची बाब नाकारता येणार नाही.