ओलसर मूर्ती, वेल्डिंग अपुरे अन् आगमनाची घाई? भुलेश्वरच्या राजाची २ टन मूर्ती कोसळली; संकेत नेवसे आणि ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 5 0

मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमनावेळी घडलेल्या भीषण दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुमारे २८ फूट उंच आणि दोन टन वजनाची गणेशमूर्ती पूर्णपणे सुकलेली नसताना मंडळाने आगमनाची घाई केल्याचा दावा समोर आला आहे.
ही मूर्ती भायखळ्यातील मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी थायलंडमधील प्रसिद्ध गणपती मंदिरातील मूर्तीच्या धर्तीवर तयार केली होती. मूर्ती ओलसर असल्याने आणखी दहा दिवसांनी घेऊन जाण्याची सूचना मूर्तिकाराने मंडळाला केल्याचे सांगितले जात आहे.
मात्र आगमनादरम्यान मूर्तीच्या गळ्यातील हार निसटला आणि पाठीमागील वेल्डिंगही सुटल्याचे स्थानिकांनी सांगितले. पुन्हा वेल्डिंग केल्यानंतरही भुलेश्वरमध्ये पोहोचल्यावर मूर्ती कोसळली.
मूर्ती सावरण्याचा प्रयत्न करणारे संकेत नेवसे आणि ब्रिजेश जोशी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, तर इतर जण जखमी झाले.
दरम्यान, एल. टी. मार्ग पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे. तर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि गणेश गल्लीच्या मुंबईचा राजा मंडळाने भुलेश्वरचा राजा मंडळाला मदतीचा हात दिला असून, मुंबईचा राजातर्फे ३ लाख रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.