पुण्यात फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांनो सावधान! RTO चा कारवाईचा इशारा!

Rokhthok Maharashtra 7 0

पुण्यात फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांनो आता सावधान! ‘दादा’, ‘भाऊ’, ‘शेठ’ लिहिल्यास होणार कारवाई
पुण्यात वाहनांच्या नंबर प्लेटवर ‘दादा’, ‘भाऊ’, ‘शेठ’ अशी नावे लिहिणाऱ्यांनो सावध व्हा! कारण नियमबाह्य आणि फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर आकर्षक फॉन्ट, वेगवेगळ्या आकारातील अंक, विशिष्ट व्यक्तींची नावे आणि हटके डिझाइन वापरण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, नियमानुसार वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट आणि निर्धारित स्वरूपात असणे बंधनकारक आहे.
फॅन्सी नंबर प्लेटमुळे सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक पोलिसांची यंत्रणा आणि ई-चलन प्रणालीला वाहनांची ओळख पटवताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे. वाहनाचा परवाना रद्द करणे किंवा वाहन जप्त करण्यासारख्या कारवाईचाही उल्लेख करण्यात आला आहे.
त्यामुळे वाहनचालकांनो, स्टाइलच्या नादात नियम मोडू नका! आपल्या वाहनावर अधिकृत स्वरूपातील, स्पष्ट आणि वाचनीय नंबर प्लेटच वापरा.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.