मुंबई

उरलेली अर्धी चड्डी काढण्यात येईल; मुख्यमंत्र्यांच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई : कोल्हापूरमध्ये रविवारी शिवसेना आणि भाजप युतीच्या पहिल्या प्रचारसभेचा नारळ फुटला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘पोपट’ बोलून त्यांच्यावर तोफ डागली. यावर आता मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘स्वतः अर्धी चड्डी घालणाऱ्यांनी आमच्या कपड्यांची काळजी करू नये, नाहीतर उरलेली चड्डी पण काढून घेण्यात येईल’, असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे एकमेकांवर टीकास्त्र सुरू झाले आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज यांनी जाहिर केले. मात्र यंदाच्या निवडणूकीत भाजपविरोधी प्रचार करण्याचा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला असून त्यांच्या प्रत्येक भाषणातून ते भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत.

राज यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यानी कोल्हापूरच्या सभेत उत्तर दिले. ‘काही लोक स्वत: बोलू शकत नाहीत, म्हणून पोपट नेमू लागले आहेत. बारामतीने पोपट नेमला आणि तो बोलू लागला.’ असे म्हणत ‘आमचे कपडे कुणीही उतरवू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे कपडे आम्ही उतरवले. मुंबईत लंगोट शिल्लक होती, पण उद्धव ठाकरेंनी तीदेखील उतरवली. त्यामुळे कुणाची सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी घरी बसा आणि मोदींना पंतप्रधान होताना पाहा’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनसेवर टीकेची झोड उडवली.

Comment here