रायगड

पार्थ पवारांच्या माणुसकीचे दर्शन… अपघातग्रस्त तरुणाची केली मदत, स्वत: गाडी थांबवून रुग्णालयात पाठवले

रायगड । (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राज्यभरात लोकसभेच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय नेतेमंडळी व्यग्र झाल्याचे चित्र आहे. असंख्य भेटीगाठी, प्रचारसभा, कॉर्नर बैठका यात उमेदवारांनी कोणतीही कसर ठेवलेली नाही. मात्र, या धावपळीतही माणुसकीचं दर्शन पार्थ पवारांनी घडवलं आहे. न्हावा गावात प्रचारासाठी निघालेल्या पार्थ पवार यांच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात ट्रकने धडक दिलेला तरणाबांड युवक रस्त्यावर विव्हळताना दिसला. जखमी तरुणाला पाहताच पार्थ पवारांनी स्वत:ची गाडी थांबवून जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.

न्हावा खाडी गावातील रूपेश रमण ठाकूर असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सानपाड्याच्या मिलेनियम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्तांना मदत करा, असे नेहमीच आवाहन केले जाते, परंतु पार्थ पवार यांनी स्वत: लोकसभेच्या घाईगडबडीत माणुसकीचे दर्शन घडवले. पार्थ पवारांसोबत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हेही होते. पार्थ पवारांनी स्वत: जखमीची विचारपूस करत त्याला न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्यासोबत रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.

पनवेल-उरण मध्ये नेहमी होतात रस्ते अपघात

जेएनपीटी बंदर आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या औद्योगिकीकरणाच्या निमित्ताने या संपूर्ण परिसरात अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दिवसागणिक या ठिकाणी अपघातांमध्येही वाढ झाली आहे. मागच्या काही वर्षांत पाचशेपेक्षा जास्त तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

न्हावा गावाच्या चढणीवर दुपारच्या सुमारास मोटारसायकल स्वार तरुणाला अज्ञात ट्रकने धडक दिली. यात रूपेश रमण ठाकूर हा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याच्या डाव्या पायाचा हाड मोडले आहे. अपघातानंतर तो रस्त्यावर विव्हळत असतानाच मावळ लोकसभा निवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा ताफा त्या मार्गावरून जात होता. पार्थ पवार यांनी अपघात झाला असल्याचे पाहताच लागलीच आपले वाहन थांबवून जखमीच्या मदतीसाठी धावून गेले. पार्थ पवार त्यांच्या पहिल्या भाषणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले होते. मात्र, पार्थ पवारांच्या या मदतीमुळे त्यांच्यातील माणुसकीचाही प्रत्यय उपस्थितांना आला आहे.

Comment here