मुंबई | गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला जीवनध्येय सांगणाऱ्या आणि ते गाठण्याचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन असे म्हणत त्यांनी राज्यातील सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या राज्याला, देशाला गुरू-शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्यापैकी सर्वांनीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेली आहे. सार्वजनिक जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण खूप काही शिकत असतो. ते देखील आपले गुरुच असतात, असा संदेश देणारे ट्विट त्यांनी केले आहे.
व्यास ऋषींचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. व्यास ऋषी हे संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी चारही वेदांची रचना केली आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.
भारतीय संस्कृतीत आज असलेल्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरुकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरुची पूजा करणे, त्यांच्यासमोर नतमस्तक होणे असे या दिवशी अपेक्षित असते.