पुणे

कुत्र्याच्या तोंडावरुन कार घातल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यु : डॉ. मेघना चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे :

सोसायटीत फिरणार्‍या कुत्र्याच्या तोंडावरुन कार घातल्याने त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाल्याची घटना कोरेगाव पार्कमधील  एका सोसायटीत घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी डॉक्टर महिलेविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. डॉ. मेघना चावला  (रा. डुंगरसी पार्क सोसायटी, बंडगार्डन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना सोसायटीच्या आवारात मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि डॉ. मेघना चावला या एकाच सोसायटीत राहतात. डॉ. चावला यांनी त्यांच्या ताब्यातील कार हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पुणेकर यांच्या विटकरी रंगाच्या कुत्र्याला धडक दिली. कुत्र्याच्या तोंडावरुन त्यांच्या कारच्या डाव्या बाजूचे पुढील चाक गेल्याने कुत्रा जखमी झाला होता. फिर्यादी यांनी त्यांना उपचाराकरीता प्राण्यांचे डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. कोरेगाव पोलीस तपास करीत आहेत.