Uncategorized

कोऱ्या पाकिटांवर कोटींचे पत्ते, भाजप सत्ताधाऱ्यांच्या पाशवी बहुमताच्या आधारावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याच्या कोथरूडमधून आमदार झाल्यापासून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने महापालिकेतील संस्कृतीच बदलून टाकली आहे. मनमानी कारभार, पाशवी बहुमताच्या जोरावर स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी शेकडो कोटींच्या टेंडर्सना मंजुरी आणि पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेच काम भाजपकडून सुरू आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी एकदा कोल्हापुरात, ‘मी कोरं पाकीट, पाकिटावर पक्ष जो पत्ता लिहिल, तिथे जाईन,’ असे वक्तव्य केले होते. पक्षाने चंद्रकांत पाटील यांच्या पाकिटावर कोथरूडचा पत्ता लिहिल्याने ते पुण्यातून आमदार झाले. मात्र, त्यांचे पुण्यात आगमन झाल्यापासून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांचे कोरे पाकीट भरून देण्याचा जणू सपाटाच लावला आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत पाशवी बहुमताच्या जोरावर आणि गुंडगिरीच्या वातावरणात क्रिस्टल कंपनीला सुरक्षारक्षक नेमणुकीसाठी ४१ कोटी रुपयांचा, ११ गावांसाठी एसटीपीचा पावणे चारशे कोटींचा विषय मान्य करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने शेकडो कोटींचे विषय ऐनवेळी आणण्याचा, कोणतीही चर्चा न करण्याचा आणि स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळाच्या वातावरणात तो विषय मान्य करण्याचा सपाटाच सत्ताधारी भाजपने लावला आहे. पुणे महापालिकेच्या जागा – फ्लॅटची विक्री करण्याचा विषय असेल वा ॲमेनिटी स्पेस दीर्घ कराराने भाड्याने देण्याचा विषय असो, यातून केवळ आर्थिक हितसंबंध जोपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिधी जोपासण्याचेच काम करण्यात येत आहे. ठेकेदारांना ठेका देऊन निव्वळ अर्थप्राप्ती करण्याचा प्रकार सत्ताधारी भाजपकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच, वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने संशयाचे धुके अधिक गडद होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या सर्व प्रकरणांचा निषेध करण्यात येत आहे.

पदाधिकाऱ्यांची नेमणूक हा भाजपचा अंतर्गत विषय असला, तरी केवळ आर्थिक हितसंबंधांपोटी मोजक्या पदाधिकाऱ्यांना संधी देऊन त्या माध्यमातून महापालिकेत एकाधिकारशाही राबविणे आणि पुणेकरांच्या पालिकेवर आर्थिक दरोडा टाकण्याचा प्रकार दिसून येत आहे. या सर्व प्रकारातून सर्वसामान्य पुणेकरांची लूट करण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात येत आहे.

महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेला हा मनमानी कारभार निषेधार्ह असून, भाजपने एकाधिकारशाही व पुणेकरांवर आर्थिक दरोडा घालण्याची वृत्ती थांबवावी, अशी विनंती मी करीत आहे. भाजपच्या या कारभाराबद्दल आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अखत्यारितील सर्वच यंत्रणांकडे तक्रार दाखल करणार आहोत. शिवाय, पुणेकरांच्या हक्कासाठी व भाजपकडून सुरू असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी रस्त्यावरील लढाईही जोमाने लढू, असा इशारा आम्ही भाजपला देत आहोत.

आर्थिक नाद, तिकडींचा वाद
मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी महापौर मा. मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष मा. हेमंत रासने व सभागृह नेते मा. गणेश बीडकर यांच्यात जोरदार वाद झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळेच, गेली कित्येक वर्षे सकाळी ११ वाजता सुरू होणारी स्थायी समितीची बैठक ही चार वाजता सुरू झाली होती. आर्थिक प्रकरणातूनच हा वाद झाल्याची चर्चा आहे. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, महापौर मोहोळ यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली होती. शेवटी वरिष्ठ नेत्यांनी फोनद्वारे वाद मिटविण्याची सूचना केली आणि ही बैठक पार पडली.

राष्ट्रवादीचे सदस्य अधिक सजग
गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून अनेक विषय चर्चेविना मंजूर करून मोगलाई कारभाराचे दर्शन घडविण्यात येत आहे. मंगळवारच्या बैठकीतही असाच प्रकार घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना म्हणणे मांडता आले नाही. हा विषय दफ्तरी दाखल करण्याचा प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत. तसेच, येथून पुढे निवडणुका होईपर्यंत स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही सदस्य अधिक सजगतेने या विषयांकडे पाहतील, अशा प्रकारच्या सक्तीच्या सूचना पक्षातर्फे देण्यात आल्या आहेत.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष