मुंबई

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द

मुंबई :  रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी देण्यात आला आहे.

दरम्यान, या भेटीत नेमक्या कोणत्या विषावर चर्चा झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र, राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले होते.

करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी सरकारला हातभार म्हणून रयत शिक्षण संस्थेकडून दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागिल वर्षी केली होती.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून सुमारे दोन कोटींचा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमुखाने घेतल्याचे त्यावेळी पवार यांनी स्पष्ट केले होते.