मुंबई

अखेर मनसे- भाजप युती!! ‘या’ जिल्ह्यात एकत्र लढणार

राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सुरू असतानाच अखेर भाजप-मनसेच्या युतीचा नारळ फुटला असून पालघर येथे भाजप आणि मनसे एकत्र पोटनिवडणुक लढणार आहेत.

पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे. भाजप- मनसे युतीमुळे महाविकास आघाडी पुढे आव्हान उभे राहणार आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून राज्यात काही ठिकाणी भाजप आणि मनसे मध्ये युती होऊ शकते का अशी शक्यता निर्माण झाली होती. आता राज्यभरात भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना, पालघरमध्ये पोटनिवडणुकीसाठी युती झाली आहे.