पुणे

पशुसंवर्धन विभागाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचविण्यसाठी प्रयत्नशील-पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

पुणे दि. २ :- ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार केले.

खेड तालुक्यातील कडूस येथे राज्यस्तरीय पशुसंवर्धन दवाखाना श्रेणी-२ नवीन इमारती आणि निवासी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा दुधउत्पादन संघाचे संचालक अरुण चांभारे, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत पोखरकर, माजी सभापती अरुण चौधरी, सरंपच निवृत्ती नेहरे, उपसरपंच कैलास मुसळे आदी उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रतिदिन १० लाख लिटर दुध खरेदी करुन त्याची तयार पावडर मागणीप्रमाणे पुरवठा करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. देशी गायी संशोधन केंद्रात विविध प्रकारच्या देशी गायीच्या जाती वाण आहेत. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी दुग्ध व्यवसायात वाढ करणे काळाची गरज आहे. येत्या काळात सुधारित वाणाद्वारे शेळीपालनाच्या माध्यमातून शेळीचे वजन ५० ते ६० किलो करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देशी गायीचे प्रतिदिन १५ लिटर दुध अपेक्षित असून त्यादृष्टीने संशोधनाला महत्व देण्यात येत आहे.

कुक्कुटपालन व्यवसाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावे यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय फिरते दवाखाने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचविले आहेत. विभागातील रिक्तपदांची लवकरात लवकर भरती केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आणि कष्टकाऱ्यांसाठी शासन काम करीत असल्याचे श्री. केदार म्हणाले

आमदार श्री. मोहिते यांनी तालुक्यातील विविध विकासकामांबाबत माहिती दिली. यावेळी उत्कृष्ट महिला गोपालकांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कडूस येथील पशुसंवर्धन दवाखाना २००४ मध्ये सुरू करण्यात आला. कडूस व गारगोटवाडी परिसरातील पशुधनावर उपचार करण्यासाठी हा दवाखाना महत्वाचा आहे. वापरासाठी सुरक्षीत नसलेली जुनी इमारत पाडून दवाखान्याच्या व निवासस्थानाच्या संरक्षक भिंतीसह नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. कामावर सुमारे ३८ लाख ५० हजार लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.