पुणे

भोसरी, उरुळी देवाची, व इस्लामपूर परिसरात महावितरणच्या भरारी पथकाची मोठी कारवाई, साडे ३ कोटीच्या वीज चोऱ्या उघडकीस आणून ग्राहकांना दिली नियमित वीजबिले

प्रतिनिधी स्वप्नील कदम

पुणे ‘: महावितरणच्या भरारी पथकाने डिसेंबरमध्ये भोसरी, उरुळीदेवाची व इस्लामपूर येथे धाड टाकून तीन कोटी 68 लाख रुपयांच्या 135 वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच इतर अनियमिततेच्या 139 प्रकरणात 3 कोटी 86 लाखाची बिले देण्यात आलेली आहे.

पुण्यातील भोसरी परिसरात भरारी पथकाने धाड टाकुन बेकरी प्रोडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने अतिरिक्त एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या ग्राहकाने एक लाख 55 हजार युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला 21 लाख, 89 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.दुसऱ्या एका घटनेत उरुळीदेवाची परिसरातील पेट्रोल पंप व्यावसायिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. या ग्राहकांनी एल. टी. केबलला टॅपिंग करून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. सदर ग्राहकांनी 39 हजार 627 युनिट्सची वीजचोरी केल्याचे उघड झाले असून त्याला 16 लाख 18 हजार 420 रुपयांचे बिल देण्यात आले आहे..

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे स्वीट मार्ट व्यावसायिकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याने त्याला 76 हजार 504 युनिटचे रुपये 17 लाख 52 हजार रुपयांचे बिल देण्यात आलेले आहे.

यासोबतच पुणे शहर व इस्लामपूर शहरातील इतर भागात धाडी टाकून एकूण 135 विजचोऱ्या पकडल्या तर इतर अनियमिततेची 139 प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत. यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.   

दरम्यान, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोठया प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीविरुद्ध भरारी पथक मोहिमा राबवित आहे.
महावितरणाच्या भरारी पथकाने केलेल्या कामाचे जनतेतून कौतुक केले जात आहे. कोणत्याही राजकीय किंवा स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता महावितरणाने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.