पुणे

“शेतात काम करत असतात, वीज पडून तरुणाचा मृत्यू”

प्रतिनिधी स्वप्नील कदम

लोणी काळभोर (पुणे ): शेतात उसाला पाणी देत असताना अंगावर वीज पडून एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर परिसरात शनिवारी (दि. १५) घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघली आली आहे. या घटनेने लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीपक दशरथ काळभोर (वय २९, रा. तरवडी – रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक काळभोर यांचा विवाह दीड महिन्यापूर्वीच झाला असून त्यांची शेती ही कॅनॉल शेजारी आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दीपक काळभोर उसाच्या पिकाला पाणी देत असताना अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज कोसळली. दरम्यान, दीपक काळभोर आणखी शेतातून घरी न आल्याने घरच्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता दीपक काळभोर हे जमिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. या घटनेने काळभोर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भाऊजय असा मोठा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड करीत आहेत.