पुणेमहाराष्ट्र

पुणे : पुण्यात सदाशिव पेठेत मुलीवर झालेल्या कोयता हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांचा शिवसेनेकडून सत्कार…!

पुण्यातील सदाशिव पेठेत गजबजलेल्या रस्त्यांवर एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या युवकाला जीवाची पर्वा न करता पकडून युवतीचे प्राण वाचविणाऱ्या युवकांचा शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. युवतीला वाचविणाऱ्या तीनही युवकांना शहर शिवसेनेकडून प्रत्येकी 25 हजार रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

लेशपाल जवळगे व त्याचे दोन सहकारी या तरुणांचा सत्कार पुणे शहर कार्यालयात शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लेशपाल याला 25 हजारांचे बक्षिस देण्यात आले असून या घटनेवेळी लेशपालच्या हाताला मार लागला असून त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार आहे. त्याचा खर्चही शिवसेनेकडून केला जाणार असल्याचे शहर प्रमुख भानगिरे यांनी सांगितले.

त्यावेळी पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी, प्रमोद प्रभुणे, युवासेना प्रमुख निलेश गिरमे, महिला आघाडी प्रमुख पूजा रावेतकर, उपशहर प्रमुख श्रुती नाझीरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सदाशिव पेठेत हा प्रकार घडला होता. भानगिरे म्हणाले की, या तीनही युवकांनी दाखविलेलं धाडस उल्लेखनिय आहे. वास्तविक पाहता त्या ठिकाणी अनेक लोक असताना त्या मुलीला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आले नाही.मात्र या तीन तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा नाही करता त्या मुलाचा प्रतिकार केला. व तिचा जीव वाचवला .जर हे युवक पुढे आले नसते तर नक्कीच अनुचित प्रकार घडला असता . मात्र, या तिघांनी पुढे येत युवतीला नवे आयुष्य दिले आहे. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे नाना भानगिरे म्हणाले.

काल घडलेले प्रकरण फार गंभीर असल्याने पुणे शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह फरासखाना पोलिसांची भेट घेतली व तरुणीवर हल्ला करणाऱ्या युवकावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आसल्याचे भानगिरे यांनी सांगितले.