पुणे

महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चाचे हडपसर मध्ये होणार आगमन पुण्यात ३० तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता

पुणे – महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून उद्या (दि. 30 रोजी) हडपसर मध्ये आगमन होणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभेने ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची सांगता होणार असून हडपसर मध्ये जय्यत तयारी केल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप व विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी दिली.

 

महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे ‘शैक्षणिक कर्ज ‘ धोरण लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एल्गार पुकारला असून दि. २७ ते ३० डिसेंबर दरम्यानच्या भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ आयोजित केला आहे.

 

‘शेतकरी आक्रोश मोर्चा दि. ३० डिसेंबर रोजी बारामती येथून मेडद, कऱ्हावागज, जळगाव, माळवाडी, तारडोळी मार्गे मोरगाव येथे आल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावर मंदिरासमोर कोपरा सभा होईल. त्यानंतर आंबी बु. मार्गे जेजुरी येथे आल्यावर कोपरा सभा होईल. त्यानंतर आक्रोश मोर्चा शिंदवणे मार्गे हवेली तालुक्यात प्रवेश करेल. शिंदवणे येथे स्वागत स्वीकारुन उरळीकांचनला रवाना होईल. या ठिकाणी जुन्या इलाईट हॉटेलसमोर कोपरा सभा होणार असून त्यानंतर सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी फाटा, थेऊर फाटा मार्गे लोणी काळभोर येथे आल्यावर रेल्वे स्टेशनजवळ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणी काळभोर येथून कवडीपाट टोलनाका मार्गे मांजरी फार्म, शेवाळवाडी फाटा, १५ नंबर, हडपसर गाडीतळ मार्गे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाईल. मांजरी फाटा चौकात हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे व व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभा होणार असून शरद पवार, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रवीण तुपे यांनी दिली.

 

देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या न्याय मागण्यांसाठी काढण्यात येत असलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले असून पुण्यातील सभेला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा संदेश राज्याला जाणार आहे.