कोल्हापूरच्या आश्रमशाळेतून 13 वर्षीय मुलगा निघून आला; मसूरमध्ये सूरज पाटोळेंच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत
कोल्हापूरच्या आश्रमशाळेतून निघून आलेला १३ वर्षीय मुलगा कराड तालुक्यातील मसूरमध्ये रात्रीच्या वेळी एकटाच आढळून आला. मात्र, रॉयल कारभार ग्रुपचे संपर्कप्रमुख सूरज दादा पाटोळे यांच्या सतर्कतेमुळे हा मुलगा सुखरूप आपल्या चुलत्यांकडे परतला.
साईराज गणेश घाडगे असे या मुलाचे नाव असून तो मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे. आई-वडील नसल्याने तो सांगलीतील चुलत्यांकडे राहत होता. शिक्षणासाठी त्याला कोल्हापूरमधील आश्रमशाळेत दाखल करण्यात आले होते.
मात्र, काही कारणास्तव साईराज आश्रमशाळेतून निघून आला आणि रेल्वेने मसूर येथे पोहोचला. रात्री सुमारे ११ वाजता तो मसूरच्या चौकात घाबरलेल्या अवस्थेत एकटाच बसलेला होता.
यावेळी सूरज दादा पाटोळे यांची त्याच्यावर नजर पडली. त्यांनी मुलाची विचारपूस करून त्याला जेवण दिले आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर सांगलीहून त्याचे चुलते मसूरमध्ये आले आणि साईराजला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
मात्र, हा मुलगा आश्रमशाळेतून नेमका का निघून आला? त्याला तिथे काही त्रास होत होता का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन आवश्यक चौकशी करण्याची भूमिका सूरज पाटोळे यांनी व्यक्त केली आहे.
मध्यरात्री अनोळखी ठिकाणी सापडलेल्या चिमुकल्याला आधार देत त्याला सुखरूप कुटुंबीयांकडे पोहोचवणाऱ्या सूरज पाटोळे यांच्या सतर्कतेचे आणि माणुसकीचे कौतुक होत आहे.





