फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोला आग; परिसरात धुराचे साम्राज्य भूमी ग्रीन प्रकल्पामागील कचऱ्याला आग; उंच ज्वाला, धुराचे लोट; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
फुरसुंगी : फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपो परिसरात रविवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. भूमी ग्रीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या मागील बाजूस टाकण्यात आलेल्या प्रक्रियेतील रिजेक्टेड कचऱ्याने पेट घेतल्याने आगीने मोठे स्वरूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाला दूरवरून दिसत होत्या, तर परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
उन्हाच्या तीव्रतेमुळे आग लागल्याचे कारण पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या आगीमुळे पॉवर हाऊस, भेकराईनगर आणि फुरसुंगी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. सायंकाळच्या वेळी लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. रात्रीपर्यंत आग आटोक्यात येईल, असे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.

कचरा डेपो परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता रिजेक्टेड कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धुराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, कचरा डेपोशेजारील जागा मोकळी करण्याच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी मुद्दाम आग लावण्यात आली असावी, असा संशय ग्रामस्थ विशाल हरपळे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. याबाबत भूमी ग्रीन प्रक्रिया प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, ऑक्टोबर हिटमुळे कचऱ्यामध्ये नैसर्गिकपणे मिथेन वायू तयार होऊन तो पेट घेतो, त्यामुळे आग लागते. आता आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
चौकट – वारंवार आग लागतेच कशी?
महापालिकेची याठिकाणी सर्व प्रकारची यंत्रणा, सीसीटीव्ही असताना याठिकाणी वारंवार आग लागतेच कशी? ज्यावेळी उघड्यावर कचरा टाकला आहे, त्याबद्दल एनजीटीकडून पालिकेला नोटीस आल्यावरच ही आग लागते म्हणजे याठिकाणी संशयाचा धूर नक्कीच आहे.
— भगवान भाडळे (अध्यक्ष, कचरा डेपो हटाव संघर्ष समिती).
मायमराठी वृत्तपत्र प्रतिनिधी : गणेश भागीवंत





