पुणे

माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते – वेदांत अग्रवाल अपघात प्रकरणावर अजित पवार नेमके काय म्हणाले?

पुण्यातील कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री भीषण अपघात झाला होता. एका बिल्डरचा मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना संपवलं. मात्र त्याला अवघ्या १५ तासांच्या आतमध्ये जामीन मिळाला. व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण चिघळलं असून पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते…
पुण्यातील वेदांत अग्रवाल अपघात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पोर्ष या स्पोर्ट्स कारने त्याने टू-व्हिलरवर असलेल्या तरूण-तरूणीला धडक दिली. दोन जणांना जागेवरच संपवणाऱ्या वेदांत याची अवघ्या 15 तासांमध्ये जामिनीवर सुटका झाली. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेदांत याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीसही अॅक्शन मोडवर आले आणि वेदांतच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल यांना अटक केली. हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले. मात्र टिंगरे यांनी हे आरोप बदनामी करण्यासाठी होत असल्याचं म्हटलं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तांना फोन करत चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेश दिले आहेत.

 

नेमके काय म्हणाले अजित पवार?
पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते, असं अजित पवार म्हणाले. अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेशही पवारांनी दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणातील दोन्ही पब सील केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ब्लॅक आणि कोझी या क्लबचे मालक आणि मॅनेजर यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली गेली आहे. आज त्यांना कोर्टात नेण्यात आलं होतं. तर वेदांतचे आरोपी विशाल अग्रवाल याला उद्या कोर्टात हजर करण्यात आला आहे.

ब्लड पाठवलं असून त्याचे रिपोर्ट आले नाहीत. कोणतीही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. आरोपींनी मद्यप्राशन केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहे. त्यांनी अल्कोहोलसाठी ऑनलाईन पेमेंट केले होते. त्याचे बिल आले आहे. आमच्याकडील पुराव्यावरून आरोपींनी अल्कहोल घेतल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पालकमंत्री म्हणून अजित पवार याप्रकरणी अपयशी….
पुण्यामध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवरून पुण्याला येऊन पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली व या अपघात प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही अशा इशारा दिला परंतु अतिशय हट्टाने पालकमंत्री पद घेतलेल्या अजित पवार यांनी मात्र या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलं नाही किंवा बैठकही घेतली नाही त्यामुळे पालकमंत्र्यांवर सोशल मीडियात टीका होत आहे.