रत्नागिरी / प्रतिनीधी:(विलास गुरव) अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी यांच्याकडून दरवर्षी मंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.सन २०२४- २५ च्या जीवनगौरव पुरस्काराने यावर्षी श्रीकृष्ण ( भाई ) हरिश्चंद्र विलणकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कोण आहेत भाई विलणकर,.! थोडक्यात परिचय…
त्यांच्यामध्ये असणाऱ्या आजपर्यंतच्या खेळातील व इतर कलागुणांचे कर्तुत्व पाहून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
लहानपणापासूनच त्यांना अनेक खेळांबद्दल असणारे आकर्षक तसेच दहीकाल्यामध्ये ( दत्त मंदिर, घुडे वठार ) येथे जुने बलाढ्य लोक आपल्या ताकदीचा प्रयोग करून दाखवत असत त्यामध्ये गोळाफेक, कबड्डी ,मल्लखांब अशा प्रकारचे खेळ पाहून भाईंना असे वाटायचे की आपणही पुढे जाऊन यांच्यासारखं बनायचं. लहानपणी विलणकरवाडी, घुडेवठार चवंडेवठार, पाटील वाडी येथील मित्रांसोबत समुद्रकिनारी वाळूमध्ये कबड्डी खेळणे व इतर खेळ खेळणे सुरूच असायचे. पुढे शालेय शिक्षणामध्ये तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी, गोळा फेक अशा प्रकारच्या खेळामध्ये प्राविण्य मिळवता मिळवता व्यायाम शाळेमध्ये जाण्याची सुरुवात त्यांनी केली व झुंजार मंडळाच्या वतीने राधाकृष्ण मंदिरामध्ये हुतुतु चा पट्टीचा आवडता खेळाडू म्हणून त्यांची सर्वत्र प्रसिद्धी होऊ लागली. पुढे हुतुतु चे रूपांतर कबड्डी मध्ये झाले तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातील करिअरची वाटचाल सुरू झाली.
झुंजार संघाचे खेळाडू तयार करून अनेक तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा त्यांनी जिंकल्या. त्यांचा खेळ पाहून आजूबाजूच्या शाळा, हायस्कूल मधून मुलांना सराव व मार्गदर्शन देण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागले. पुढे भाईंनी घडविलेले तेच खेळाडू शालेय शिक्षणानंतर भाईंच्याच संघात खेळून खेळाच्या जोरावर त्यातील अनेक जणांना पोलीसमध्ये, रेल्वेमध्ये तसेच अनेक कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या लागल्या.
कबड्डी सोबत कुस्ती हा भाईंचा आवडता खेळ झाला. १९७५ मध्ये महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियनशिप त्यांना मिळाली. विशेष म्हणजे या कुस्ती खेळासाठी भाईंचा कोणीही गुरु नव्हता, परंतु त्यावेळेला असणारे जागतिक मल्ल दारासिंग यांचे चित्रपट अनेक वेळा बघून कुस्तीतले सर्व डावपेच त्यांनी आत्मसात केले. त्यांच्या बरोबर त्यांच्या तालमीत अनेक कुस्तीगीर तयार झाले.
योगायोगाने राज्य मेडिकल स्पर्धेमध्ये त्यांच्या खेळाचे कौतुक प्रत्यक्ष ज्यांना भाईंनी गुरु मानले ते दारासिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यावेळी दारासिंग यांनी भाईंची कुस्तीतील चपळाई, डावपेच पाहून दारासिंग यांनी भाईंना तुमचे गुरू कोण? असा प्रश्न विचारला असता तुम्हीच माझे गुरु असे सांगितल्यावर त्यांनी आनंदाने भाईंना आलिंगन दिले व कौतुक करून आशीर्वाद दिला.
१९८२-८३ मध्ये महाराष्ट्र राज्य संघातून ( सिव्हील सर्विस ) मध्ये भाईंची निवड झाली. २००३ मध्ये ” नॅशनल मास्टर श्री ” बॉडी बिल्डिंग मध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकले. वयाच्या ७५ व्या वर्षी ” जिल्हा मास्टर श्री ” हा किताब त्यांना मिळाला.
२०१७ मध्ये हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांची बायपास करावी लागली. डॉक्टरांनी अजिबात व्यायाम करायचा नाही, वजने उचलायची नाहीत असे सांगितले होते. पण हे ऐकतील ते ” भाई विलणकर ” कसले.! त्यानंतर दोन वेळा शरीर सौष्ठ स्पर्धा ” मास्टर श्री ” व ” भंडारी श्री ” त्यांनी मारल्या हे सर्व करत असताना मुळातच शेतकरी असलेला हा माणूस भरपूर शेती करत असे. नोकरी सांभाळून खेळही त्यांनी जपले. फक्त शेती गेली परंतु बाकीचे छंद त्यांना आजही गप्प बसू देत नाहीत.
घरात मोठे बंधू रोहिदास विलणकर शिक्षक होते, त्यांच्या अंगी सर्व गुण होते. त्यामध्ये पेटी वाजवणे, बुलबुल तारा वाजवणे, बासरी वाजवणे तसेच अभिनय कला हे सर्व भाईंनी त्यांच्या मोठ्या बंधून कडून शिकून घेतले. आज कुटुंबा मध्ये त्यांचे लहान भाऊ अण्णा विलणकर (सक्शन इंजिनियर ) चांगले मूर्तिकार आहेत. विलणकर बंधूंचा मोठा गणपती हा सुप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पुतण्या मुकुंद विलणकर व अंशुल विलणकर हे चांगले कलाकार आहेत. भाईंची मोठी मुलगी उषा विलणकर नॅशनल पॉवरलिफ्टर तशीच कबड्डीपटू म्हणून तिचा नावलौकिक आहे. दुसरी मुलगी ज्योती विलणकर कबड्डीपटू व मुलगा राकेश विलणकर हा ” भारत श्री ” ला कॉम्पिटिशन केलेला बॉडी बिल्डर तसेच कबड्डीपटू म्हणून आजही कबड्डीच्या मैदानावर महसूल खात्याचा संघ विजयी करत आहे.
या सर्वाच्या मागे हे सर्व सांभाळताना संसाराकडे जर कधी लक्ष देता आलं नाही तर अगदी शेतीपासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत पूर्ण संसाराची जबाबदारी त्यांच्या पत्नी सौ. श्रीलता विलणकर यांचा यात मोलाचा वाटा आहे हे विसरता येणार नाही, तसेच या माझ्या वाटचालीला आज साठ वर्ष पूर्ण झाली त्या सर्व वाटचाली मध्ये माझा मित्र श्री सदानंद त्र्यंबक जोशी याचाही फार मोठा मोलाचा वाटा आहे असे भाई स्वतः आजही सांगतात.
आजही तरुणांना लाजवेल तसेच आजच्या तरुण पिढीनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा या महान व्यक्तिमत्वाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
सदर पुरस्कार सोहळा गुरुवार दि. २७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४-३० ते ७-०० यावेळेत अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी येथे मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृह, जोशी पाळंद, वरची आळी, सुभाष रोड, रत्नागिरी येथे होणार असून या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.