पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
पुण्यातील प्रसिद्ध एस. पी. बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीत अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी १२च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकाराची बिर्याणी हाऊसच्या मालकाला तक्रार केल्यानंतर त्याने ग्राहकांशी हुज्जत घातली. तसेच या घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्याला दमदाटी करत मारहाणही केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास वीरेंद्रसिंग ठाकूर हे मुलांबरोबर सदाशिव पेठेतील एस.पी.’ज बिर्याणी हाऊसमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी बिर्याणीची ऑर्डर दिली. काही वेळाने बिर्याणी आल्यानंतर त्यात अळ्या आढळल्याने ठाकूर यांनी त्याचा व्हिडिओ काढून ही बाब बिर्याणी हाऊसच्या मालकाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र हॉटेल प्रशासनाने त्याची दखल न घेता उलट ठाकूर यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच व्हिडिओ काढल्याबद्दल दमदाटी करत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, या घटनेमुळे पुणेकरांमध्ये खळबळ उडाली असून या बिर्याणी हाऊसवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
तर खाण्याचे बिल चुकविण्यासाठी काही लोक अशाप्रकारचे कृत्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा बिर्याणी हाऊसने केला आहे. गरमा गरम बिर्याणीमध्ये मटणाचा चुरा होतो, तर अळीचं काय होत असेल. त्यात अळ्या जीवंत कशा राहू शकतात, असा सवाल करतानाच हॉटेलला बदनाम करण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला. भविष्यात असा प्रकार घडणार नाही, असं हॉटेल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
