पुणे ः प्रतिनिधी
हडपसरमधील गोरगरिबांच्या मुलांसाठी हक्काचे ज्ञानपीठ म्हणून ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाची ओळख आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यांचाच वसा हाती घेऊन कै. सौ. शैलाताई माळी यांनी महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या माध्यमातून ज्ञान गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविली, असे मत ज्येष्ठ समाजसेवक आणि देणगीदार मदनलाल दरडा यांनी व्यक्त केले.
ससाणेनगरमधील महात्मा फुले विद्या निकेतनच्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयामध्ये कै. सौ. शैलाताई माळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, कै. सौ. शैलाताई माळी, द्रौपदीबाई माळी, रतन माळी या महापुरुष पुतळा अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सिद्धी फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पाताई कटारिया, ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे, माजी महापौर-नगरसेवक वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, माजी नगरसेवक सुनील बनकर, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, संजय शिंदे, महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई वाघ, सचिव प्राचार्य रवींद्र वाघ, संस्थापक सचिव रतन माळी, द्रौपदीताई माळी, सुशीला जाधव, संचालक डॉ. प्रवीण देवरे, शालीग्राम माळी, पर्यवेक्षक अभय पाटील, संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, माजी महापौर वैशाली बनकर आणि नगरसेवक योगेश ससाणे यांनी कै. सौ. शैलाताई माळी यांचे नाव महापालिकेच्या पवित्र वास्तूला दिले जाईल, असे आश्वासन दिले. या परिसरातील गरिबांच्या मुलांसाठी जवळची आणि हक्काची शाळा म्हणून महात्मा फुले विद्यालयाची ओळख आहे, ती कायम राहणार आहे. तसेच या विद्यालयातील विद्यार्थी दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अव्वल ठरले आहेत. विद्यालयाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता कायम राखली आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे म्हणाले की, महात्मा फुले विद्यानिकेतनचे संस्थापक रतन माळी यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली, तसेच काळानुरूप त्यामध्ये बदल केले आहेत. इंग्रजी-सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रमही अवगत केला आहे. तसेच या परिसरामध्ये पत्रकारितेचे शिक्षण असले पाहिजे. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून
प्रेस रिपोर्टर्स एज्युकेशन फाउंडेशन मागिल अकरा वर्षापूर्वी सुरू केले आहे. दरवर्षी विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून पत्रकारितेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची तळमळ कायम दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिद्धी फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पाताई कटारिया म्हणाल्या की, महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांनी थोर महात्म्यांचे पुतळे बसवून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. थोरांचे विचार मुलांच्या मनावर कोरून चांगले संस्कार देण्याचे काम या विद्यालयामध्ये होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद महाडिक यांनी प्रास्ताविक केले. रेश्मा सातपुते आणि डी.टी.एड. कॉलेजच्या प्राचार्या उज्ज्वला सावंत यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी ओव्हाळ यांनी आभार मानले.

awesome
awesome