पुणे

लोणीकंद पोलिसांची मोठी कामगिरी खून व दरोड्यातील आरोपींना ठोकल्या बेड्या

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख डीपी (विद्यूत रोहीत्र) चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना लोणीकंद पोलिसांनी सहा महिन्यापुर्वी झालेल्या शिक्रापूर येथे झालेल्या दरोडा व खून खूनाचा उलघडा करत आरोपीला अटक केली आहे.

दिनेश कुंदन पवार (वय 25, रा. तळेगाव ढमढेरे ) व शिवा नाना जगताप (वय 40, रा दौंड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पवार हा दरोडा व खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे रोजी आरोपी पवार याने त्याच्या चार साथीदारांसोबत शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमदाडे मळा पिंपळवाडी रोड पाबळ वस्ती येथील तुळसाबाई पर्वती जाधव यांच्या घरी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकला. जाधव यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. यावेळी जाधव यांची मुलगी शकुंतला प्रकाश शिंदे (वय 50) हिच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केला असता, आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केला. शकुंतला ही माहेरीआईकडे आली होती. खून केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दरोडा व खूनाचा गुन्हा दाखल आहे. पाच महिन्यापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते.

दरम्यान लोणीकंद पोलिस ठाण्याचे तपास पथक डीपी चोरीच्या अनुषंगाने तपास करीत होते. त्यावेळी पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे यांना बातमी मिळाली होती की, पेरणे डोंगरगाव रोडवर दोन व्यक्ती डीपीच्या जवळ संशयास्पदरित्या फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांना तेथून शिवा नाना जगताप व दिनेश पवार या दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.दोघांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी येथील परिसरातून पाच डीपी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी चोरीचा माल घेणारा व्यक्ती विरम दीपाराम चौधरी (वय. 50, रा. शिक्रापुर तळेगाव रोड, शिक्रापुर) याला देखील अटक करण्यात आली.

दिनेश पवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना तो काही तरी लपवून ठेवत असल्याचा संशय पोलिसांना आला. अनेकदा चौकशी करून देखील तो बोलत नव्हता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच पवार याने शिक्रापूर येथे दरोडा टाकून महिलेचा खून केल्याची कबुली दिली .ही कामगिरी पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार, उपनिरीक्षक सुरज गोरे, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने, मोहन वाळके, विनायक साळवे, कैलास साळुंखे, अजीत फरांदे, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग माने, सागर शेडगे यांनी ही कामगिरी केली.