पुणे

मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  प्रतिनिधी -स्वप्नील कदम 

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथील इंडस टॉवरच्या केबल बॅटरी व इतर साहित्यांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत. तर चोरट्यांकडून ७ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. 

अतिश राजु साठे (वय १९, धंदा मजुरी, रा. वेताळबाबा वसाहत, गणपती मंदिराचे पाठीमागे, हडपसर गाडीतळ पुणे), प्रशांत मच्छींद्र वारे (वय २५, रा सध्या फ्लॅट नं ३०३. बिल्डींग नं बी ०६, अंतरिद्वा हौसिंग सोसायटी, नेहरुनगर, पिंपरी पुणे, मुळ गाव कोपटी, ता- – शिरूर कासार जि. बीड) आणि अखिलेश रामचंद्र गौतम (वय-२३ धंदा- भंगार व्यवसाय, सध्या रा- चारवाडा, मांजरी बु, हडपसर, पुणे, मुळ रा सिद्धार्थनगर, इटवा, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अनुराग चंद्रभुषण रागी (वय ४०, धंदा नोकरी, साई पार्क, गावलीनगर, दिघी, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रागी है थेऊर फाटा येथील इंडस टॉवरच्या मेंटनन्स व देखरेखीचे काम पाहत होते. दरम्यान, या टॉवरच्या केबल बॅटरी व इतर साहित्याची अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी रागी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस अंमलदार शैलेश कुदले यांना मोबाईल टॉवरचे केबलची चोरी करणारा आरोपी अतिश साठे हा कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एच.डी.एफ.सी. बँकेच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी अतिश साठे याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. चोरट्यांकडून ७ गुन्ह्यांची उकल तर तब्बल ५० किलो तांब्याच्या तारा जप्त…दरम्यान, आरोपी अतिश साठे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्ह्यासह लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. तसेच हे गुन्हे प्रशांत वारे व अखिलेश गौतम या दोन साथीदारांच्या मदतीने केले आहेत. अशी माहिती आरोपी साठे याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५० किलो तांब्याच्या तारा सुमारे ३० हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत.

 

हि कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितिन गायकवाड, सुदर्शन बोरावके, सतिश सायकर, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देवीकर, दिगंबर जगताप, निखिल पवार, दिपक सोनवणे, चक्रधर शिरगीरे, शैलेश कुदळे आणि बाजीराव वीर यांच्या पथकाने केली आहे.