पुणे

पिस्तुलाचा धाक व ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करून शेती बळकवण्याचा प्रयत्न, लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल एकाला ठोकल्या बेड्या, तिघांवर गुन्हा दाखल …!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे 

पुणे :पूर्व हवेली मध्ये सध्या जमिनीला सोन्याचा बाजार असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे जमिनी घेण्यासाठी धनदांडगे लोक अक्षरशः साम दाम दंड अशा पद्धतीचा सर्रासपणे वापर करताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात भोगवाटादार वर्ग दोनच्या जमिनी साठी तर असे लोक कावळ्यासारखे टपूनच बसलेले असतात.कारण वर्ग दोन जमिनीचे मालक हे अशिक्षित व गरीब घराण्यातले असतात त्यामुळे अशा जमिनी लाटण्यासाठी धनदांडगे लोक कुठल्याही थराला जाऊन त्यांच्या जमिनी अगदी कमी रक्कम देऊन ताब्यात घेतात. अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात.

तसेच एका प्रतिष्ठित व्यक्तीने साठेखताच्या नावाखाली कधीही रद्द न होणारे कुलमुक्तीयार पत्र करून जमिन लाटण्याचा प्रकार केल्याची चर्चा होताना दिसत आहे. आणि   ताजे उदाहरण म्हणजे म्हातोबाच्या आळंदीला घडले आहे. एका शेतकऱ्याची जमिन जबरदस्तीने बळकाविण्यास विरोध केल्याने चौघा जणांच्या टोळक्याने पिस्तुल व सुरा दाखवून त्यानंतर ट्रॅक्टर अंगावर घालून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजता आळंदी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी हेमंत शंकरराव तोडकर (वय ४७, रा. मंगळवार पेठ) यांनी लोणी काळभोरपोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोपट सुदाम सुर्वे, विठ्ठल सुदाम सुर्वे व इतर दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल सुदाम सुर्वे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे त्यांच्या शेतामध्ये गेले असताना पोपट सुर्वे, विठ्ठल सुर्वे इतर दोघांना घेऊन ट्रॅक्टर, मोटारसायकलवरुन तेथे आले. फिर्यादी यांनी आमचे शेतामध्ये ट्रॅक्टर कसा काय घेऊन आला, असे विचारले असता. पोपट सुर्वे याने मी तुम्हाला ओळखत नाही. ही माझी शेती आहे. मी कसण्याकरीता व तिला कंपाऊड करण्याकरीता आलो आहे.

 

यामध्ये अडथळा आणल्यास गंभीर परिणाम होतील, असे बोलून धमकी दिली. मोटारसायकलवरील एका साथीदाराने कमरेला खोचलेला पिस्तुल व सुरा दाखवला. विठ्ठल सुर्वे याने फिर्यादींना तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर या ट्रॅक्टरखाली तुम्हाला चिरडून टाकू. आज काहीही झाले तरी याला जिवंत सोडायचे नाही. याला इथेच संपवून गाडून टाकू, असे म्हणून ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर चालू करण्यास सांगितले. फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.