पुणेमहाराष्ट्र

“पुण्यात हडपसरमध्ये साकारतेय प्रभू श्रीरामाचे पहिले शिल्प… शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना “भानगिरे यांच्या प्रयत्नातून श्रीराम चौकात भूमिपूजन…

पुणे -महापालिकेत गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. तसेच भाजपच्या तत्कालीन नगरसेविका वर्षा तापकीर यांनी त्यांच्या प्रभागात श्रीरामाचे शिल्प उभारण्यासाठी प्रस्ताव मांडून तो स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला होता. असे असताना पुण्यात प्रभू श्रीरामाचे पहिले शिल्प उभारण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून हांडेवाडी येथील श्रीराम चौकात हे शिल्प उभारले जाणार आहे. दोन डिसेंबरला या शिल्पाचा पायाभरणी कार्यक्रम होणार आहे.

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. पालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक होते. त्यातील एक नगरसेविका वर्षा तापकीर यांनी धनकवडी-आंबेगाव पठार (प्रभाग क्र ३८) येथील आंबेगाव पठारमधील मोकळ्या जागेत असलेल्या क्रीडांगणामध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य शिल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. तापकीर यांचा हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आल्यानंतर काही सभासदांनी त्याला आक्षेप घेत क्रीडांगणामध्ये हे शिल्प उभारू नये, असा विरोधदेखील केला होता. मात्र, पालिकेत भाजपचे संख्याबळ असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मान्य करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला होता. स्थायी समितीनंतर हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी पालिकेच्या मुख्य सभेत गेला. मात्र, त्यानंतर पालिकेच्या सभासदांची मुदत संपुष्टात येऊन पालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून कारभार सुरू केला. त्यानंतर या प्रस्तावावर प्रशासकांनी काही केले नाही असे वर्षा तापकीर यांनी सांगितले.

शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी २०१८ मध्ये महापालिकेकडे हांडेवाडी भागात प्रभू श्रीरामाचे शिल्प उभारण्याची मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला होता. या पूर्णाकृती शिल्पाचा संपूर्ण खर्च दशरथ बळीबा भानगिरे ट्रस्ट यांच्याकडून करण्यात येणार होता. हा प्रस्ताव मुख्य सभेने मान्य करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. नाना भानगिरे यांनी शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्याचा पाठपुरावा सुरु ठेवला आणि आता नगरविकास खाते तसेच पोलिस महासंचालक कार्यालयाने हे शिल्प बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हे शिल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भानगिरे यांनी सांगितले. पुण्यात उभारण्यात येणारे श्रीरामाचे पूर्णाकृती शिल्प हे देशातील पहिले शिल्प असणार आहे, असा दावा भानगिरे यांनी केला आहे. २ डिसेंबरला याचा पायाभरणी समारंभ होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार भरत गोगावले हे उपस्थित राहणार आहेत.