पुणे

पोटनिवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृतीवर भर

पुणे, दि. १२: जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून लक्ष केंद्रीत करण्यात येत असून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामध्ये लोककलाकर, नेहरु युवा केंद्राचे युवक, महाविद्यालयीन युवक, स्वीप पथके आदींच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व सांगण्यात येत आहे. रस्त्यावर पथनाट्ये सादर करुन नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. शनिवारवाडा येथे सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक भेट देत असल्याने शालेय विद्यार्थी, लोककलाकारांच्या माध्यमातून त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. इथे सेल्फी स्टँडद्वारेही मतदानाचा संदेश देण्यात येत आहे.

मतदारसंघातील शासकीय कार्यालयाचा परिसर, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे आदी गर्दी होणाऱ्या ठिकाणी मतदान जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी, शिक्षक-पालकांशी संवाद, मतदानाचे आवाहन करणाऱ्या सुंदर रांगोळ्यांचे प्रदर्शन आदी उपक्रम या जनजागृती मोहिमेअंतर्गत घेण्यात येत आहेत.

यावेळी मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी उपलब्ध संकेतस्थळ, ॲप तसेच अन्य पर्याय याविषयी माहिती देण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांगत्वाची नोंदणी करण्याची सुविधा, पीडब्ल्यूडी ॲप (सक्षम- ईसीआय), दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, ८० वर्षावरील नागरिकांसाठी पोस्टल मतदानाची सुविधा, आचारसंहिता भंगाची माहिती देण्यासाठी नागरिकांसाठी उपलब्ध असलेले ‘सी- व्हिजील’ ॲप आदींविषयी माहिती देऊन निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

विशेषतः कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात विशेष उपक्रम राबविण्यावर दोन्ही मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भर दिला आहे. मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन करणारे संदेशही विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येत आहे. समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येत असून त्यासाठी लहान लहान चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील मतदार यादीत आपला तपशील तपासून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.