दिल्ली

पुण्याजवळ रांजणगाव इथे महाराष्ट्रातील पहिलं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी.

नवी दिल्‍ली : भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांची एक व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, महाराष्ट्रात पुण्याजवळ रांजणगांव-फेज 3 इथे, 492.85 रुपये खर्चून ग्रीनफील्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.

केंद्रित इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, तसेच कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी आज ही घोषणा केली. “भारतात, नोएडा, कर्नाटक आणि तामीळनाडू या राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रे आहेत. या ठिकाणी, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय स्टार्ट अप्स यांची युनिट्सही आहेत. केंद्र सरकार या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रात भागीदार असून राज्य सरकारांच्या सहकार्याने, ह्या केंद्राद्वारे राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत” असे त्यांनी यावेळी सांगितले. रांजणगांव इथल्या ईएमसी मध्ये, नजीकच्या भविष्यात, 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल, आणि 5000 पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होईल असे ते म्हणाले.

तसेच, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी यावेळी अशीही घोषणा केली, की 1000 कोटींचा सेमीकॉन इंडिया फ्यूचर डिझाईन अभियानाला चालना दिली जाईल, ज्याद्वारे महाराष्ट्रात सेमीकंडक्टर डिझाईन स्टार्ट अप्सना पाठबळ मिळेल. लवकरच, महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक उद्योगांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या रोड शोला देखील आपण उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यातील सी-डैक (C-DAC)कंपनी या कामासाठीची नोडल संस्था असेल, असेही चंद्रशेखर यांनी सांगितले.

या ईएमसी साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला आणि राज्य सरकारच्या राज्य औद्योगिक संस्थेला मंजूरी देण्यात आली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. या दोन्ही नेत्यांनी रांजणगांव इथे हा प्रकल्प यावा यासाठी प्रयत्न केले होते.” असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.

कोविड नंतर, जागतिक मूल्यसाखळी आणि पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यांनंतर सर्व देश/राज्यांसाठी आज अत्यंत स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालं आहे.

“2014 पासून पूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोन्सपैकी 92 टक्के फोन्स आयात केलेले असत. आता 97 % मोबाईल फोन्स भारतात निर्माण झालेले असतात. 2014 मध्ये भारतातून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची काहीही निर्यात होत नसे. आता मात्र, 70,000 कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात होत आहे.” असे चंद्रशेखर म्हणाले.