
जळगाव(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-
समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि वृत्तपत्रात क्षेत्रात काम करणार्या पत्रकारांसह इतर घटकांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन व्हावे या मागणीसाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बंद पडलेल्या पतसंस्थांसाठी आम्ही फेडरेशन उभा केले असुन त्यात विम्याची हमी दिली. याच धर्तीवर प्रसारमाध्यमांसाठीचे महामंडळ असावे अशी पुष्ठीही त्यांनी जोडली. तर जाहिरात धोरणातील काही नियमात सुधारणा करण्याबरोबरच पत्रकारांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीत शासनाने राखीव कोटा द्यावा यासह दहा ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आले. राज्यभरातून दीड हजारापेक्षा जास्त पत्रकारांनी यात सहभाग नोंदवला.
जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे 14 वे राज्य अधिवेशनाचा समारोप कांताई सभागृहात रविवार दि. 9 जून रोजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, कीर्तनकार आणि पत्रकार यांच्यासमोरच खोटे बोलण्यासाठी घाबरतो. असत्य बोलल्याशिवाय आमची दुकानदारी चालत नाही. निवडून येण्यासाठी काय काय करावे लागते? दररोज आमदाराला मतदारसंघात फिरण्यासाठी आणि इतर कार्यक्रमांना मदत करताना जवळपास दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च येतो. तरी आमदारांच्या पेन्शनवर मोठा गदारोळ केला जातो. लोकप्रतिनिधींच्या खर्चाचा हिशोब लक्षात घेऊन माध्यमांनी लिहिले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील स्पर्धेने मराठी माध्यमांच्या शाळेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्याच पध्दतीने समाजमाध्यमाच्या वाढत्या प्रभावाने वृत्तपत्रांसमोरही आव्हान उभे राहिले आहे. बंद पडलेल्या पतसंस्थांना पुनर्जिवित करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असुन त्यात विमाही दिला जाणार आहे. त्याच पध्दतीने वृत्तपत्रांना मदत करण्यासाठी आणि माध्यमांमध्ये काम करणार पत्रकारांसह इतर घटकांच्या विकासासाठी आर्थिक महामंडळ स्थापन होणे आवश्यक आहे. पत्रकार संघाच्या मागणीला आपला पाठिंबा असुन शासन दरबारी यावर प्रयत्न करू, पत्रकार संरक्षण कायद्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
तर खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांच्या लेखनीतून नेतृत्व लोकापर्यंत पोहचत असले तरी बातमीमुळे कोणाचे राजकीय आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राजकारणात काम करणार्यांना पत्रकारांची कधी कधी भीती वाटते अशी खंतही त्यांनी व्यक्त करुन पत्रकारांच्या मागण्यांबाबत आपण शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
राज्य संघटक संजय भोकरे यांनी पत्रकारांनी काम करताना स्वतःचे आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. समाजातील भोंदुगिरी आणि अंधश्रध्देच्या विरुध्द प्रभावीपणे प्रबोधन केले तरच सकारात्मक बदल होऊ शकतो. प्रगत समाजातही अंधश्रध्देमुळे महिला बळी जात असल्याच्या घटना घडतात ही खेदाची बाब आहे. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तर प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला असला तरी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. यासाठी पाठपुरावा करावा. वृत्तपत्र विक्रेता संघटनेने महामंडळाची मागणी केली असुन या मागणीला पाठिंबा देत प्रसारमाध्यमातील पत्रकारांसह सर्व घटकांना मदत करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. राज्यात बातमी प्रसिद्ध केली म्हणून पत्रकारांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे प्रमााण वाढले आहे. बातमीमुळे दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत. यापुढे तक्रार आल्यास चौकशी करुन गुन्हा दाखल करावा. महामार्गावरील टोलमधून पत्रकारांना सुट द्यावी, अधिस्वीकृती पत्रिकेतील नियमात सुधारणा करावी, हल्ल्यात किंवा अपघातात जखमी झाल्यास पत्रकाराला दहा लाख रुपयांची मदत द्यावी, दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कुटुंबियांना वीस लाख रुपये आणि एकाला शासकीय नोकरीत घ्यावे. लघू वृत्तपत्रांना जीएसटीतून वगळावे, यासह दहा ठराव मांडले. उपस्थित पत्रकारांनी या ठरावाला समर्थन दिले.
पहिल्या सत्रात प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी संघटनेची भूमिका मांडुन माध्यमांचे बदलते स्वरुप या विषयावरील चर्चासत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा पत्रकारांनी अवलंब केला पाहिजे. माध्यमांचे स्वरुप बदलले तरी काळानुरुप त्यात बदल केला पाहिजे. माध्यमांच्या स्पर्धेत पत्रकारांनी समाजामध्ये आपली विश्वासार्हता निर्माण करण्याचे मोठे आव्हान असुन ते आपल्या कामातून पेलावे लागणार आहे असे स्पष्ट केले.
तर संपादक मिलींद कुलकर्णी यांनी स्मार्ट फोनच्या वापराने प्रत्येक जण आता पत्रकार झाला आहे. त्यामुळे वास्तव आणि आभास याची जाणीव पत्रकारांना असणे आवश्यक असुन सतत अभ्यास आणि निरीक्षणातून समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. वादाचे प्रसंग टाळून संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे असे आवाहन केले.
तर ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर यांनी काळानुसार बदलत चाललेल्या पत्रकारीतेचे विश्लेषण करत समाज माध्यमांचा वापर गंभीरपणे झाला तर या माध्यमात सुध्दा विश्वासार्हता निर्माण होवू शकते अशी आशा व्यक्त केली. माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही पत्रकारांमुळेच लोकशाही बळकट असल्याचे सांगुन या क्षेत्राला पाठबळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाची माहिती देतांना ग्रामीण भागात अडचणीत आलेल्या पत्रकारांसाठी संघटना कायम मदतीसाठी पुढे येते त्यामुळे पत्रकारांनीही संघटनेचे काम वाढवावे असे आवाहन केले.
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण पुढीलप्रमाणे –
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण करण्यात आले असून या वर्षीचा पुरस्कार उत्कृष्ट कार्याचा प्रथम पुरस्कार ठाणे जिल्हा पत्रकार संघ भगवान चंदे, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मराठवाडा विभागातुन बिड जिल्हा पत्रकार संघ वैभव स्वामी, तृतीय क्रमांकाचा विर्दभ पुर्व महेश पानसे यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र गौरव पुरस्कार समाजभुषण प्रमोद अण्णा लबडे, उद्योजक सुरेश भागवत, डॉ भुषण मगर, आरोग्य, रविंद भादाले शिक्षण, डॉ स्वामी शिरकुल समाजभुषण या राज्यस्तरीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले. हा वितरण सोहळा दुपारच्या सत्रात विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी पत्रकारांना विविध उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, विदर्भ प्रमुख बाळासाहेब देशमुख, पश्चिम महा. सरचिटणीस सतीश सावंत, विदर्भ सचिव निलेश सोमणी, कोकण विभाग प्रमुख भगवान चंदे, नागपूर विभाग प्रमुख महेश पानसे, उत्तर महा. संपर्क प्रमुख सुभाष डोके, जेष्ठ पत्रकार अतुल परदेशी, प्रदेश कार्यकारींनी सदस्य नीलकंठ कराड, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, शरद कुलकर्णी, इम्रान शेख, यांसह सर्व जिल्हाध्यक्ष ,तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट –
पत्रकारांनी आपली चुंबळ होवू देवू नये-वसंत मुंडे
प्रदेश कार्याध्यक्ष तथा औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी अधिवेशनात राज्यातून आलेल्या पत्रकारांबरोबर खुली चर्चा केली. अधिस्वीकृतीपासून ते वैयक्तिक पातळीवरच्या प्रश्नांना उत्तरे देत संवाद साधला. पत्रकारांनी काम करताना स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातात. राजकीय, प्रशासकीय यंत्रणेकडून वापर केला जातो त्यामुळे काम करताना आपण कोणाच्या किती जवळ जायचे? याचा सारासार विचार केला तर अडचणी येत नाहीत. त्यामुळे आपली कोणी चुंबळ करणार नाही याची दक्षता पत्रकारांनी घेतली पाहिजे असे सांगत पत्रकारांच्या समस्यांचा ऊहापोह केला.
