पुणे

घरात कोणी नाही, चोरांनी साधला डाव

  प्रतिनिधि: स्वप्नील कदम

                              घरांत कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी २ तोळे, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व ९ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८९ हजार रूपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला असल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. 

                 याप्रकरणी संदिप अशोक गुजर (वय ३७, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजर यांची पत्नी जयश्री ( वय २८ ), मुलगा द्रोण ( वय ६ ) व मुलगी ओजस्वी ( वय ९ महिने ) हे दिवाळी सणानिमित्त गावी गेलेले होते. तर गुजर हे गुरुवार ( २५ नोव्हेंबर ) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारांस  घराला कुलूप लावून खालील मजल्यावरील शटर बंद करून कंपनीचे बसने कामावर गेले होते. 

                शुक्रवार ( २६ नोव्हेंबर  ) रोजी पहाटे ४ – २५ वाजण्याच्या सुमारांस त्यांची पत्नी, मुले मेव्हण्यासमवेत जळगाव येथून घरी पोहोचले. त्यांना खालील मजल्यावरील जाळीचे शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसले. ते वर आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याचा कडी – कोयडा तोडलेला होता. आतील हॉल व बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. संपुर्ण घराची पाहणी केली असता बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकर मधील पत्नीचे मिनी गंठण, कानातले टॉप्स व वेल व मुलाचे दागिणे असे २ तोळे, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पत्नीचे चांदीचे पैजण, जोडवे व मुलाचे कमरेची साखळी, पायातले वाळे, हातातील बाजूबंद असे ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम ६ हजार तसेच हॉलमध्ये टेबलावर ठेवलेले पाकीटातील रोख रक्कम ३ हजार  रूपये मिळून आले नाहीत. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमांनी घराचा दरवाजाचा कडी-कोयडा तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूमचे लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरी करून गेलेची खात्री झाल्याने गुजर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भागवत शेंडगे हे करत आहेत.