पुणे

तुका झालासे कळस – जगदगुरु तुकाराम बीज निमित्त उपसंपादक सुधीर मेथेकर यांचा विशेष लेख

 तुका झालासे कळस 

फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच ९ मार्च १६५० हा दिवस आपण “तुकाराम बीज” म्हणून साजरा करतो. याच दिवशी संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठ गमन झाले असल्याचे मानले जाते. यंदाच्या वर्षी तुकाराम बीज 9 मार्च रोजी आहे. देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो, तद्वतच संपूर्ण वारकरी बांधवांना हा दिवस अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या दिवशीच संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले, ज्या नादरुकीच्या झाडाखाली त्यांनी वैकुंठला जाण्याअगोदर ध्यान केले ते अजूनही देहू या ठिकानि आहे.

संत तुकाराम महाराज (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत व प्रबोधनकार होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते.

स्व.डॉ. रामचंद्र देखणे सरांनी लिहिलेले चिंतनात्मक एक ग्रंथ “तुका झालासे कळस” लॉकडाउनच्या काळात संपूर्ण वाचून झाले. ऐकून पंधरा प्रकरणात जगतगुर श्री तुकाराम महाराजांच्या जन्मापासून ते वैकुंठगमना पर्यंतचा पूर्ण आढावा ह्यात आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्यक्ष तुकाराम महाराज आपल्या समोर ऊभे आहेत असे वाटते.

तुकाराम महाराजांच्या समाज प्रबोधना बरोबर त्यांच्या गाथ्यातील रूपके, ओवी, गौळणी, भारुडे, पाळणा, शेतावरील अभंग मनाला भावणारा आहेत.

आजच्या काळात जातीभेदाची भिंत उभी राहते आहे, परंतु त्याकाळात
संत तुकाराम महाराज यांनी जाती भेदांवर आक्षेप घेतला होता व आपल्या अभंगातून प्रबोधन केले ते आजही गरजेचे ठरते आहे. जातीभेद अमंगळ असून त्यात अहित आहे. आपल्या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात:

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |
भेदाभेदभ्रम अमंगळ |
आइका जी तुम्ही भक्त भागवत |
कराल तें हित सत्य करा ||

आजच्या परिस्थिती मध्ये जात-धर्म, उच-नीच, गरिब-श्रीमंत आदी क्षेत्रात प्रमाणाबाहेर भेदाभेद केल्या जात आहे. यामुळे चांगले, गुणात्मक ध्येय साध्य होणार नाही. हे तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्याला जाणीव करून देते आहे हे आपण विसरून चालणार नाही.

तसेच संत तुकाराम महाराज पुढे असे म्हणतात की,

कोणाही जीवाचा न घडो मत्सर |
वर्म सर्वेश्वर पुजनाचे ||

एकमेकांच्या बद्दल द्वेष मत्सर असणे योग्य नाही. कोणाचाही द्वेष मत्सर करु नये. एकमेकांच्या बद्दल आदर असणे हे समाज हितासाठी आवश्यक आहे. अशा विविध ओवी मधून तुकाराम महाराज आपल्याला फार मोठा संदेश देत आहेत. त्याचे मनन व चिंतन करणे गरजेचं आहे.

सध्या अंधश्रद्धा बोकाळलेली दिसते त्यावरही आपल्या अभंगातून तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञानाचे महत्त्व सुध्दा दिले आहे. जसे:
नवसें कन्यापुत्र होती |
तरि कां करणे लागे पती |
जाणे हा विचार |
स्वामी तुकयाचा दातार ||
थोडक्यात नवसा सायासाने असे घडू शकत नाही. त्यापेक्षा तर्कशुद्ध विचार करून जीवनकार्य साधावे.

आज तुकाराम महाराज बीजच्या निमित्ताने त्यांनी अभंगातून दिलेली बहुमल्य शिकवण अंगिकारल्यास समाजात एकोपा नांदेल, अंधश्रद्धा दुर होईल. यासाठी संत तुकाराम महाराजांची प्रबोधनात्मक “गाथे”चे मनन, चिंतन करून जीवनक्रम साधायला हवा, आपल्या पासून सुरुवात करुया.

🌹जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय 🌹