नाशिक

आघाडीचं फायनल ठरलं…. प्रत्येकी 125 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी लढणार, 38 जागा मित्र पक्षाला, मनसे आघाडीत नाही शरद पवार यांची पत्रकार परिषदेत घोषणा

नाशिक (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-
आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढण्यावर मतैक्य झाले असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जाहीर केले. जागावाटपाचे हे सूत्र काँग्रेसला मान्य असले तरी काही जागांची अदलाबदल करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. मात्र मनसे आघाडीत घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपाचा नेहमी घोळ होतो. पण यंदा आघाडीत जागावाटपावर मतैक्य झाले आहे, असे पवार यांनी सांगितले.

नाशिकमध्ये पवारांच्या दौऱ्याच्या वेळी छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा सुरू झाली होती. पण जागावाटप आणि अन्य विषयांच्या संदर्भात मुंबईत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना आपण भुजबळांना केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आणि चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला.

कांद्याचे निर्यातमूल्य घसरणे, वर्षभरात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बाजारातील मंदी, हे सर्व निश्चलनीकरणासह विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आहेत. याविषयी कोणीही बोलायला तयार नाही. केवळ राजकीय चर्चा घडत आहेत. आगामी निवडणुका या ईव्हीएम यंत्रावरच होणार, परंतु निकालाविषयी कोणतेच भाष्य करणार नाही. देशाचे नेतृत्व सक्षम हातात असावे, या विचाराने लोकसभेसाठी मतदान केले जाते. तुलनेत विधानसभा निवडणुकीत स्थानिक विषयांना प्राधान्य देण्यात येते. यामुळे लोकसभा तसेच विधानसभेत निवडणुकीनंतर चित्र वेगळे असते. विधानसभेत एक चेहरा देऊन चालत नाही. राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला म्हणजे निवडणुका जवळ आल्या असे समजावे, असा टोलाही पवार यांनी भाजपला हाणला.

विरोधक म्हणून काम करण्यात मजा आहे, कारण आपण किंवा आपला पक्ष किती तळागाळापर्यंत पोहोचला, हे खऱ्या अर्थाने कळते. आमच्या पक्षातील काही लोकांना विरोधी पक्षात राहण्याची सवय नाही. सत्तेची आस त्यांना असल्याने पक्षांतर होत असल्याचे पवार यांनी सांगितले.

पाकिस्तानचा पाहुणचार चांगला होता, या शरद पवार यांच्या विधानामुळे नागरिक त्यांच्यावर नाराज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सांगितले. याविषयी पवार यांनी असे कुठलेच विधान आपण राजकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रमात केले नसल्याचे सांगितले. पाकिस्तानमध्ये जाण्याचा योग आला होता. त्या वेळी अनुभवलेल्या कार्यपद्धतीविषयी पक्ष कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत काही विधान केले होते. त्याचा विपर्यास करण्यात आल्याचे पवार म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागावाटपाच्या सूत्राचे सूतोवाच गेल्या आठवडय़ात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. शरद पवार यांनीही प्रत्येकी १२५ जागांचे वाटप जाहीर केले. जागावाटपाच्या या सूत्रावर शिक्कामोर्तब करीत, काही जागांची अदलाबदल केली जावी, अशी भूमिका असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘मित्रपक्षांकडून जादा जागांची मागणी झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपापल्या कोटय़ातील समान जागा सोडाव्यात,’ असा प्रस्ताव असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

राज यांच्याशी चर्चा नाही

राज ठाकरे यांच्याशी विधानसभा निवडणुकीविषयी काही चर्चा झाली, त्या वेळी राज यांनी सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी सूचना केली. ही भूमिका आम्हाला मान्य नाही. या भूमिकेला काय अर्थ, यामुळे त्यांच्यासोबत निवडणुकीविषयी चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी नमूद केले.

‘मित्र’च नक्की नाहीत!

* काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येणार असल्या तरी आघाडीत कोण कोण मित्रपक्ष येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

* स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह चार ते पाच मित्रपक्षांना उर्वरित जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

* अजूनही मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. तसेच प्रत्येक मित्रपक्षाकडून जास्त जागांची मागणी करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.

धाकामुळे पक्षांतर

राज्यात पूर्वीही मेगाभरती झाली होती, परंतु ती या पद्धतीने नव्हती. १९५७च्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाला आणि १९६२ मध्ये पुन्हा सत्तेत आला. त्यावेळी अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. आता मात्र अर्थ आणि गृह विभागाकडून नोटिसांचा धाक दाखवत पक्षांतर घडविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

उदयनराजेंना टोला : खासदार उदयनराजे यांनी

राष्ट्रवादी निष्क्रिय असल्यामुळे आपण पक्ष बदलत असल्याची टीका केल्याविषयी विचारले असता १५ वर्षांनंतर उदयनराजे यांना कळले की पक्षात काही खरे नाही. ही समज यायला जरा वेळच लागला, असा टोलाही पवारांनी लगावला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
4 years ago

I think other website proprietors should take this site as an model, very clean and wonderful user friendly style and design, as well as the content. You’re an expert in this topic!

4 years ago

Hi! This is my first visit to your blog! We are a collection of volunteers and starting a new project in a community in the same niche. Your blog provided us useful information to work on. You have done a marvellous job!

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x