पुणे

बोगस नावे वगळा , अन्यथा आंदोलन – हवेली तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर यांचा इशारा

लोणी काळभोर :   प्रतिनिधी: स्वप्नील कदम

     येथील ग्रामपंचायतीच्या मतदारयादीमध्ये दोन – अडीच हजार नावे बोगस असून नोव्हेंबर महिन्यात मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण संदर्भात ग्रामविकास आधिकारी व बुथ लेव्हल ऑफिसर ( बी एल ओ ) यांनी या कामा बाबत टाळाटाळ केली आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करुन सक्षम आधिका-यांकडून मतदार यादी शुद्धीकरण करुन घ्यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा हवेली तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर यांनी दिला आहे. 

                        प्रशांत काळभोर यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व हवेली तहसीलदार यांना एक निवेदन दिले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या लोणी काळभोर येथील संपर्क कार्यालयात एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी या संदर्भात सविस्तर माहिती देताना ते म्हणाले निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. प्रत्येक बी एल ओंनी दुबार, स्थलांतरीत व नवीन नावे यांचा सर्व्हे करणे आवश्यक होते. तसेच नमुना नंबर ६, ७ व ८ यांचे अर्ज स्विकारून त्यांची खात्री करुन योग्य ती कारवाई करणे गरजेचे होते. परंतु लोणी काळभोर मधील कुठल्या ही बी एल ओने हे अर्ज स्विकारले नाहीत. तसेच सर्व्हेही करत नाहीत. ग्रामविकास आधिकारी सुद्धा हे अर्ज स्विकारण्यास टाळाटाळ करत असून ते कार्यालयात उपस्थित नसतात. 

                         ग्रामविकास आधिकारी व बी एल ओ हे निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमा बाबत उदासीन असून त्यामुळे दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादी मध्ये तशीच राहणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत बोगस मतदान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य त्या सक्षम आधिका-यामार्फत स्थळपाहणी करुन या ठिकाणी वास्तव्यास नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादी मधून वगळावीत. तसेच दोषी आधिकारी व कर्मचा-यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा हवेली तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर यांनी दिला आहे. 

                              या संदर्भात बोलताना हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के म्हणाले प्रशांत काळभोर यांची तक्रार प्राप्त झाली आहे. या संदर्भात हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील सर्व बी एल ओ शी व्हिडिओ काॅन्फरंसच्या माध्यमातून चर्चा केली आहे. सर्वांना कार्यालयात बोलावून चर्चा करून या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.